अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण 

अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण 

उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात, बांधकाम क्षेत्र हे सर्वात असुरक्षित क्षेत्रापैकी एक म्हणून गणले जाते, यामध्ये काम करणारे बांधकाम कामगार मजूर यांचे जीवन खूपच हलाखीचे असते. बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना लहान मोठे अपघात होतात यामध्ये त्यांना शारीरिक इजा होणे, अपंगत्व येणे या सारख्या घटना घडतात अशा वेळेस बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना अनेक संकटे व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.त्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कामगारांच्या कल्याणासाठी, त्यांच्या शारीरिक सुरक्षेसाठी सुरक्षा उपकरणे, विमा, तसेच आर्थिक सहाय्य करते. बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचावण्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विविध योजना राबवते.

अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण उद्दिष्ट

ग्रामीण भागामध्ये राहणारे आणि बांधकाम क्षेत्रामध्ये वेगवेगळी कामे करणारे बांधकाम कामगार हे सार्वजनिक तसेच खाजगी बांधकामाची कामे करतात जसे की रस्ते, इमारती,पाझर तलाव ,पाण्याच्या टाक्या ,आणि घरे तसेच यांच्या बांधकामासाठी लागणारे विटा ,दगड ,खड्या ,सीमेंट ,लोखंड ,लाकूड यासारखे  बांधकामाला लागणारे साहित्य मिळवण्यासाठी देखील अनेक प्रकारची कामे करावी लागतात

बांधकाम कामगार यांची परिस्थिति अत्यंत गरीब असून त्यांना अन्न पानी मिळवणे ,कुटुंबाचे आरोग्य ,मुलांचे शिक्षण या सारखे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी संघर्ष करावा लागतो त्यापैकीच एक म्हणजे स्वतःचा हक्काचा निवारा,जो बांधकाम कामगार इतरांची घरे घरकुल यांचे बांधकाम करतो त्याला स्वतःचे पक्के घर नसते दगड मातीच्या कच्च्या घरामध्ये ,पत्र्याच्या घरामध्ये राहावे लागते.हि परिस्थिति बदलण्यासाठी आपल्या कच्च्या घराचे पक्क्या घरामध्ये रूपांतर करण्यासाठी शासना मार्फत कामगार कल्याणकारी व महत्वाची अशी अटल बांधकाम कामगार आवास ग्रामीण योजना राबविली जाते. 

अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण हि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची महत्त्वाची योजना आहे.या मध्ये नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी 2,00,000 दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच लाभार्थ्याला जमीन खरेदी व इतर बाबींसाठी झालेल्या खर्चाच्या पूर्ततेसाठी 1,00,000 एक लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण

अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतात ? 

       ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे केलेली असेल व सक्रिय काम करत असतील फक्त असे कामगारच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. बांधकाम क्षेत्रामध्ये गवंडी काम करणारे,दगड फोडणारे,वीटभट्टी कामगार, खोदकाम करणारे,बार बेंडर, सेंटरिंग काम करणारे, मिक्सर मशीन चालक,वेल्डर,लोहार,प्लंबर यां सारखी कामे करणारे कामगार मजूर आपली नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. नोंदणी झाल्यानंतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाकडून कामगारांना त्यांच्या कामाचा उल्लेख असलेले ओळखपत्र देण्यात येते. त्याच्या आधारे  मंडळाच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा तसेच अटल आवास योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो.

    महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे नोंद असलेले ग्रामीण भागातील सक्रिय बांधकाम कामगार यांना स्वतःच्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा आता सध्या अस्तित्वातील राहत असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी मंडळामार्फत ही योजना राबविण्यात येते. त्यासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जमीन नावावर असणे आवश्यक आहे, परंतु ज्या लाभार्थी कडे स्वतःच्या नावावर जमीन नसेल असे लाभार्थी जमीन खरेदी करून त्यावर घर बांधू शकतात जमीन खरेदी करण्यासाठी व इतर जमिनी संबंधित खर्चाच्या पूर्ततेसाठी अर्थसहाय्य देखील दिले जाते.

     जमीन खरेदी करण्यासाठी आधी 50,000 रुपये एव्हढे अनुदान मिळत होते पण आता या रकमेमध्ये दुपटीने वाढ करून ते 1,00,000 रुपये एव्हढी रक्कम अनुदान म्हणून दिली जाते जेणे करून लाभार्थी जमीन विकत घेऊन आपले घर बांधू शकतात.

अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता 

     प्रधानमंत्री आवास योजने मध्ये पात्र असलेले बांधकाम कामगार अटल आवास योजनेमध्ये पात्र असतील.तसे सक्षम अधिकाऱ्याचे पत्र किंवा पीएम आवास योजनेत नाव असलेली प्रमाणित यादी अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.

     योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा नोंदणीकृत व सक्रिय बांधकाम कामगार असावा त्याच्याकडे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडून दिलेले  ओळखपत्र असावे.ओळखपत्र मिळवण्यासाठी बांधकाम कामगाराला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते ज्यामध्ये शासकीय ठेकेदाराकडे काम केल्याचे 90 दिवसाचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे देऊन नोंदणी केली जाते.

    नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगाराचे महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतःचे पती किंवा पत्नीच्या नावावर सिमेंट व वाळूने बांधलेले पक्के घर नसावे, नावावर घर नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.

    लाभार्थ्यांनी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरूपीच्या प्रतीक्षा यादीमध्ये नाव समाविष्ट नसावे.

    अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण चा लाभ प्रत्येक कुटुंबाला एक याप्रमाणे लाभ घेता येईल म्हणजे एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीच्या नावाने लाभ घेता येईल तसेच एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

    लाभार्थी बांधकाम कामगार यांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण या योजनेच्या लाभा मधून घर बांधताना कमीतकमी 269 चौरस फूट इतके चटई क्षेत्र असलेले म्हणजे भिंतींची जाडी, बाल्कनी वगळून जे निव्वळ वापरण्यायोग्य क्षेत्र आहे या वरती अनुदान देण्यात येईल परंतु लाभार्थी आपल्या इच्छेनुसार आपल्या घराच्या चटई क्षेत्रा पेक्षा जर जास्त क्षेत्राचे बांधकाम करू इच्छितो तर तो स्वतःच्या खर्चाने बांधकाम करू शकतो व आपले घर पूर्ण करू शकतो.

अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण चा लाभ घेताना घराचे बांधकाम पूर्ण करून घर बांधून झाल्याचा पूर्णत्वाचा दाखला इंजिनियर कडून घेणे आवश्यक राहील.घर पूर्णत्वाचा दाखला सादर केलेला असेल असे बांधकाम कामगार,मंडळाकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्यास पात्र राहतील.

     महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मिळणारे 18,000 रुपये अनुदान तसेच शौचालय बांधण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत मिळणारे 12,000 रुपये असे दोन्ही मिळून 30,000 रुपये अनुदान हे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण मधून मिळणाऱ्या 2,00,000 रुपयांमध्ये समाविष्ट असून पुन्हा वरील योजनांचा लाभ घेता येणार नाही.

लाभार्थीने खालीलप्रमाणे घराची रचना करणे आवश्यक आहे.

  • घरामध्ये एक बैठक हॉल आणि एक स्वयंपाकघर यांचा समावेश असावा. घराचे बांधकाम पक्क्या स्वरूपात आणि विटा,वाळू, सिमेंट यांचा वापर करून संपूर्ण घराचे बांधकाम करावे.
  • घरकुलासोबत शौचालय व स्नानघराचे बांधकाम करणे अनिवार्य राहील.
  • स्थानिक भागांच्या गरजेनुसार घराच्या छपरासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यामध्ये लोखंडी किंवा सिमेंटचे मजबूत पत्रे अथवा कौलांचा वापर करू शकतात.
  • घराची उंची कमीत कमी 10 फूट असावी.
  • घराच्या समोरील दर्शनीभागावर कामगार कल्याणकारी मंडळाचे बोधचिन्ह (लोगो) लावणे आवश्यक राहील.
logo

अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे 

   अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण योजनेचा अर्ज हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरून डाउनलोड करू शकता, अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने जमा करावा लागतो.

अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण चा अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

   अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण योजनेचा अर्ज भरताना त्यामध्ये अर्जदाराचे नाव, अर्जदाराचा नोंदणी क्रमांक, नोंदणी दिनांक, नुतनीकरण दिनांक,अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक तसेच डीबिटी लिंक असलेल्या बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल त्यासोबतच पुढील कागदपत्रे जोडावी लागतील

  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दिलेले ओळखपत्र 
  • बँक खात्याचे पासबुक 
  • रहिवासी पुरावा ( रेशन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, ग्रामपंचायत रहिवासी दाखला, मागील महिन्याचे वीज बिल यापैकी एक कागदपत्र)

  इतर कागदपत्रे 

  • प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र असल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे पत्र
  • महाराष्ट्रामध्ये स्वतःचे पती किंवा पत्नीचे नावावर पक्के बांधकाम नसल्याचे स्वयंघोषणापत्र.                             

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.  

   योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने विहित केलेल्या नमुन्यामध्ये भरलेल्या अर्जाची छाननी जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समितीमार्फत केली जाते. अर्जदाराची पात्रता आणि त्याने सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करून झाल्यानंतर पात्र झालेल्या बांधकाम कामगारांची अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण मध्ये लाभार्थी म्हणून निवड केली जाईल.

   जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समितीने लाभार्थींची निवड केल्यानंतर वरिष्ठ पातळीवर बांधकाम कामगारांची तालुका निहाय यादी तयार केली जाईल व टप्प्या टप्प्याने घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री करून झाल्यानंतर लाभार्थी बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.

अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण

Leave a Comment